Search This Blog

Monday 1 January 2018




आपणही असतो सँतियागो......
                                                                         फारूक एस.काझी
.......................................................................................................
                      मानवी जीवन अनेक शक्यातानी भरलेलं आहे. असं केलं तर हे होईल,तसं केलं तर असं होईल. या शक्यतानी आपण सतत घेरलेलो असतो. खरं तर आपण अनेक शक्यता पडताळून पाहत असतो. आपल्या विचार कक्षेत जेव्ध्म येतं तेवढं आपण धुंडाळतो. मात्र ते अंतिम असत नाही. आपल्या मर्यादा आपल्याला माहित असतात. आपण कितपत विचार करू शकतो याची एक भक्कम जाणीव आपल्यात असते. आपल्या शक्यता पडताळून झाल्या की आपण शेवटी एका अंतिम सत्याच्या शोधात निघतो. तो कुठवर जाईल, काय काय होईल याची पुसटशी जाणीवही आपल्याला नसते. मात्र तीव्र इच्छा तुम्हाला हे सर्व करायला भाग पाडत असते. ‘तुमची इच्छा तीव्र असेल तर सर्व विश्व तुमच्या मदतीला धावून येतं.’ हे सत्य आपल्यासोबत असायला हवं.
                        माणूस सतत शोधतच असतो. कुणी यश, सुख, समाधान, आनंद , शरीरसुख, आत्म्याचं सुख, कुणी जीवनाचं सत्य, कुणी स्वत:लाच शोधत असतं. शोधाचे मार्ग जरी भिन्न असले तरीही या सर्वांच्या मुळाशी शोध ही भावना फार तीव्र असते. या तीव्रतेत एक जीवनेच्छा लपलेली असते. मरणाऱ्या माणसाला जशी जगण्याची आसक्ती असते, अगदी तसाच काहीसा प्रकार तुम्हाला अशा शोधातही आढळेल.
                           बुद्धाला जीवनाचं अंतिम सत्य गवसलं. कारण त्याला ‘आपल्याला नेमकं काय पाहिजे हे माहित होतं.’ आपण शोधत राहतो ,पण काय ? याचा अजूनही आपल्यालाच शोध लागलेला नसतो. लहरी मन क्षणात इकडे –तिकडे होत राहतं. त्याच्या लहरीनुसार आपण आपलं लक्ष्य बदलत राहतो. अशा वाटा बदलत राहिलो तर आपली नेमकी वाट आपल्याला कधी गवसतच नाही. काहीना भीती वाटते पुढं जाण्याची. शोधण्याची. ते आपल्या मंडूकी विश्वात अत्यंत आनंदी असतात. त्यांना आपल्या भित्रेपणाची जाणीव असते. मात्र ते त्यापासूनही दूर पळण्याचा प्रयत्न करत असतात. आपण भित्रे आहोत हा शोध त्यांना लागलेला असतो हे निश्चित. भले ते जगाला याबाबत काही सांगत नाहीत.
                       काहीना आपल्याला काय पाहिजे याची स्पष्ट जाणीव असते. मात्र तरीही त्यांचा बराच काळ हा चाचपडण्यातच जातो. एखादा असतो ज्याला स्वत:च्या इच्छा-आकांक्षा वास्तव जीवनात उतरवता येतात. त्यातले काही अल्पसंतुष्ट असतात तर काहींच्या संतुष्टीला अंतिम सीमारेषाच नसते. अशा अनंत इच्छा तुम्हाला व्यस्त ठेवतात मात्र त्यातून साध्य काहीच होत नाही. यश म्हणजे काय याची जाणीव त्यांना असते मात्र मिळालेल्या यशाचा आनंद साजरा करायला त्यांना उसंत नसते कारण अनंत इच्छा त्यांच्या जीवनेच्च्छेला पुढे पुढे खेचत असतात. आपल्याला नेमकं काय हवंय हे माहित नसणे व आपल्याला काय हवंय हे माहित असूनही भरकटत राहणे याहून वाईट ते दुसरं काय असू शकतं.
                      ‘मक्तुब’ म्हणजे ‘विधिलिखित’. जे कुणा निर्मिकाने लिहून ठेवलं असेल ते. ते कुणाला समजतं? असं कुणी विचारलं तर ते आधी कुणीच वाचू शकत नाही. कारण एखादी घटना घडते कारण ती घडणारच होती. ते विधिलिखित होतं असं काहीसं आपलं तत्वज्ञान असतं. मुळात हे फार रंजक असतं कुणीतरी एखादं कथानक लिहून ठेवावं आणि आपण ते समोर घडतंय अशी कल्पना करावी. का घडतंय ? असा कुणी प्रश्न केलाच तर आपण तत्काळ उत्तर द्यायला सरसावतो. “ते आधीच लिहून ठेवलेलं आहे. तुम्ही त्यात बदल करूच शकत नाही.” हे वास्तव की फँटसी ? याबाबत खल होऊ शकतो. मात्र पाश्चात्य साहित्यात सतत याचा आधार घेतला जातो. उदाहरण द्यायचंच झालं तर ‘हॅरी पॉटर असो की फायनल डेस्टीनेशन सारखी अत्यंत धक्कादायक घटनांनी भरलेली सिनेमांची मालिका’ या सर्वात ही गोष्ट आपल्याला अनुभवायला मिळते.
                  भारतीय (हिंदू,मुस्लीम,ख्रिश्चन इ.) तत्वज्ञानात तर या आत्मशोधाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण भारतीय अध्यात्मात अंतिम सत्याचा शोध म्हणजेच मुक्ती असं निहित आहे. जो तो आपापल्या परीने त्याचा अर्थ काढत राहतो. मृत्यू नंतर मोक्ष मिळतो की नाही याबाबत दोनवाटा असताना त्याबाबत खात्रीशीर सांगणे तसे अवघडच. त्यामुळेच जिवंतपणी पुण्य करत राहणे हा मध्यम मार्ग सुचवला गेला असावा. जेणेकरून आपलं सत्कार्य आपलं प्रतिबिंब होऊन आपल्या वाईट प्रसंगी आपल्यासाठी धावून येईल. झाडाला पाणी घातलं तर झाड बहरतं हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य या चांगल्या कर्मात असावं असं मला तरी वाटतं. वास्तव जीवनात आपण याचे अनुभव घेतच असतो.
                     आपण आपल्या स्वप्नाचा पाठलाग करत रहावं. मग विधिलिखित काहीही असेल. शेवटी तुम्ही किती निष्ठेने आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी कष्टत राहतो याला जास्त महत्त्व आहे. आपण स्वत:वर किती आणि ‘मक्तुब’वर किती विसंबून राहायचं हे ही ठरवायला हवं.
                   ‘द अल्केमिस्ट’ (किमयागार) ही पाउलो कोएलो याची परीकथा वाचताना या सर्व विचारांचा एकेक धागा मेंदूत विणला जात होता. खरंतर मीही सातत्याने शोधतच असतो की काहीतरी. माझाही माझ्या स्वप्नांवर पूर्ण विश्वास आहे. आणि त्यांच्या पूर्तीसाठी वाट्टेल तेवढे श्रम करण्याची तयारीही. मग मी इतराप्रमाणे स्वत:त मीही सँतियागोला कल्पू लागतो. मीही मेंढपाळ होऊन काही प्रदेशाची भटकंती करून येतो. मेंढ्याकडून बिनाशब्दांची भाषा शिकून घेतो. मग मीही स्वप्न पाहून घेतो. आणि मग सुरु होतो खजिन्याचा ध्यास. एका स्वप्नाने सुरु झालेला प्रवास खजिन्यापर्यंत येऊन ठेपतो. वरवर पाहता ही एक सामान्य परीकथा जरी वाटत असली तरी या प्रवासात सँतियागोला (मेंढपाळ मुलगा) जीवनाचं जे तत्वज्ञान गवसतं तो प्रवास थक्क करणारा आहे. रोमांच, धक्के, तार्किकतेची कसोटी या आणि अशा कितीतरी गोष्टी वाचकाला आत आत ओढत नेतात. मग आपणही या प्रवासात हमराही बनतो. चालत राहतो. किमयागार ही संकल्पना अत्यंत प्रभावीपणे इथं आलेली आहे. आपणही अशाच कुणाच्या तरी शोधात असतोच की. जे संकेत देत राहतात. आपल्याला वाट दाखवत राहतात.
                    या पुस्तकात हजला प्रत्यक्ष जाण्यापेक्षा केवळ हजला जाण्याच्या इच्छेने जीवनाला आधार मिळतो असं मानणारा एक काच विक्रेता आहे. एक मार्गदर्शक राजा आहे. स्वत: गुरु आहोत याचीच जाणीव नसलेला एक उंटवाला आहे. मौनाची, अखिल विश्वाची एक अनामिक भाषा आहे, स्वत:ला उन्नत करणे, लायक बनवणे याला ‘किमयागार’ ही दिलेली उपमा आहे. आणि सर्वात महत्त्वाची आहे टी स्वप्नांना सत्यात आणण्याची जिद्द ....अदम्य जिद्द. त्यासाठी वाट्टेल त्या कष्टाची तयारी.
                    पाउलोचं एकंदरीत भीषण आयुष्य आणि त्याने लिहिलेली ही स्वप्नांच्या मागावर जायला भाग पडणारी कादंबरी यात लोक विलक्षण साम्य आहे. पाउलो स्वत:लाच या कथेत मांडतोय असंच पूर्ण कादंबरी वाचत असताना वाटत राहतं. तो आपलं अतृप्त जीवन यातून पूर्ण करतोय असंच वाटत राहतं. आपणही कथानकातील मुलगा होऊन जातो हे नाकारून चालणार नाही. काही अतृप्त इच्छा आत कुठेतरी लपून बसलेल्या असतात. संधी मिळताच त्या पुन: जागृत होतात.
              नितीन कोत्तापल्ले यांचा ओघवता अनुवाद मनाला या पुस्तकाच्या आत्म्याशी एकरूप करतो. काही ठिकाणी त्रुटी जाणवल्या तरी एकंदरीत हा एक सुंदर सहज-ओघवता अनुवाद आहे यात शंका नाही. या पुस्तकातलं तत्वज्ञान आत खोलवर पाझरत राहतं. आणि पुस्तक वाचून होताच एका नव्या उमेदीने आणि दृष्टीने आपण जगाकडे पाहायला लागतो. भीती वाईट. ‘डर के आगे जीत है’ हे वास्तव पटायला लागतं. आपण मग शक्यता पडताळून पाहायला लागतो. त्या वाईट असतील तरी पाय थांबू न देता आपल्या स्वप्नाचा पाठलाग करत राहणं ही एक मोठी गोष्ट हे पुस्तक आपल्याला शिकवतं. आपण किमयागार नाही तर सँतियागोच असतो. आणि तसं असणंच जास्त म्हत्त्वाचं.
..................................................................................................................
मंगळवार / ०२/0१/२०१८/ द अल्केमिस्ट/ वाचनकाल -0१ जानेवारी ते ०२ जानेवारी.
.................................................................................................................
काही भावलेलं...................
§ अंतर्ज्ञान म्हणजे जीवनाच्या वैश्विक प्रवाहामध्ये उडी मारणं.
§  स्वप्न प्रत्यक्ष साकारू शकतं ही शक्यताच जीवनाला किती विलक्षण आणि अर्थपूर्ण बनवते.
§  रोजरोज तीच ती माणसं भेटत असतील तर ती तुमच्या जीवनाचा भाग बनून जातात. मग होतं असं की ,हे लोक तुम्हाला बदलवू पाहतात. दुसऱ्याने त्याचं आयुष्य कसं जगावं यासंबंधी त्यांचे फार सुस्पष्ट विचार आणि मतं असतात. पण स्वत:चं आयुष्य कसं जगावं याचा विचार मात्र त्यांना स्पर्शही करत नाही.
§  जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे असते, तेव्हा सगळं जगच तुमच्या मदतीला ती साध्य करण्यासाठी धावून येतं.
§  लोकांना विश्वाच्या भाषेचा विसर पडतो कारण चित्र आणि शब्द यातच ते आनंद घेत बसतात.
§  लोक आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करायला घाबरतात कारण आपल्या लायकीविषयी त्यांना शंका असतात. स्वप्न साध्य होणार नाही अशीही भीती कधी कधी त्यांना वाटते.
§  व्यवसाय कुठलाही असो, प्रत्येक माणूस जगाच्या इतिहासामध्ये अगदी महत्त्वाची भूमिका करत असतो. आणि बहुतेक वेळेस त्याला हे माहित नसतं.
 ....................................................................................................