Search This Blog

Wednesday, 4 November 2015



 अलफाज डॉट कॉम ही मुलांसाठी लिहिलेली कथामालिका. पालकांना विनंती आहे, आपण या कथा मुलांना वाचून दाखवाव्यात. आपल्यानात्यातली मजा डब्बल होईल. आपली प्रतिक्रिया जरूर लिहा. [मुलांसाठी]

१] झंडू बाम.

             अलफाजची गाडी आज घरभर फिरून फिरून शांत झाली. अम्मीला काळजी पडली होती कि आज अलफाज एवढा शांत कसा ? अलफाज शांत मंजे काहीतरी गडबड निश्चितच आहे. हे आता सगळ्यांनाच कळू लागलं होतं.
             “अरे , आज अप्पू कुठं गेलाय ?” दादाजींनी हळूच विचारलं .खाटेखाली लपलेला अलफाज हे सगळं ऐकत होता. हसत होता. इतक्यात अम्मीही हाक मारू लागली ....”अरे अलफाज !! कुठ गेलाय माझं पिल्लू  ? कुठं शोधू  ? कहां हो बिट्टू ?”
             अलफाज खाटेखाली बसल्या बसल्या हसून सगळी मजा पाहत होता. दादाजी थकून बसले. त्यांनी ओळखलं होतं ... अलफाज खाटेखाली बसलाय ते..ते पुन्हा मजेने हाक मारत होते. आणि अलफाजचं हसू पाहून स्वत:ही खुश होत होते. दादीही ते पाहून हसत होत्या.
             अम्मीने अलफाज काय करतोय हे पाहण्यासाठी खाटेखाली डोकं घातलं . खाली अंधार होता. इतक्यात अलफाज “बव्वा ...!!!” असे ओरडला . अम्मी दचकून मागे सरकली. तिच्या डोक्याला खाटेची लोखंडी पट्टी लागली. खूप दुखलं तिला...डोळ्यात टचकन पाणी आलं . अलफाजला अंधारात ते दिसलं नाही. पण अम्मी काही न बोलता निघून गेलेली त्याला खटकलं ...तिने आपल्यावर रागवावं ,आपला गालगुच्चा घ्यावा..प्रेमाने गालाची पापी घ्यावी असं त्याला वाटत होतं . आपण ती पापी हाताने पुसल्यावर ती लटकेच रागावणार.........मग आपण हसायचं....अस्म काहीबाही त्यानं मनात ठरवलेलं.
            पण, अम्मी न बोलताच निघून गेल्याचं पाहून तो हळूच बाहेर डोकावला. आपल्या खोक्यातून टफी आपलं मुंडकं बाहेर काढून इकडचा –तिकडचा अंदाज घेतो तसंच त्याने केलं. चार पायावर चालत बाहेर आला.
“अम्मी...$$$अम्मी .... $$$!!”
अशा लाडात हाका मारत तो किचनमध्ये आला.
अम्मी कोपऱ्यात डोक्याला हात लावून बसलेली. डोळ्यात पाणी.
अलफाज पहिल्यांदा अम्मीला रडताना पाहत होता.
तो लाडतच अम्मीजवळ आला ....... “क्या हुआ अम्मी?”
त्याने अम्मीची पापी घेतली.
पण अम्मीने लक्ष दिलं नाही. तिने त्याला झिडकारलं .......
“जा जवळ येऊ नकोस माझ्या.....!!! किती त्रास द्यायचा रे .......! बोलू नकोस माझ्यासाठी...”
अम्मी उठून बाहेरचे कपडे आणायला गेली.
अलफाजला वाईट वाटले.
तो अम्मी अम्मी करत खूप वेळ मागे लागला .
अम्मीची ओढणी धरून ओढली. दादाजींना सांगितलं .....
पण, काही होईना....
अम्मी काही बोलेना..
अम्मी,  दादा-दादी  कामात आहेत हे पाहून अलफाज हळूच आतल्या खोलीत आला...
खुर्ची ओढून लहान कपाटातील झंडू बामची बाटली काढली.
ही बाटली घरातले मोठे लोक वापरतात .मी घेऊ नये म्हणून वर ठेवतात.
सर्दी झाली कि नाकाला लावतात हे औषध ....
डोकं दुखायला लागलं की दादीही डोक्याला लावतात.
अलफाजने टोपण काढलं ...आत औषध नव्हतच ....
“चूक.....आता कसं करायचं.....? पुरेल का एवढं आपल्याला...?”
अलफाजला सहज प्रश्न पडला.
त्याने बोटाने बाटली पुसून घेतली...व औषध नाकाला लावलं.
ते झणझणलं तसा तसा तो गडबडला.
या गडबडीत त्याचं बोट डोळ्याला लागलं..... झालं ........मग काय......???अलफाजचं गानं इतक्या जोरात सुरु झालं की बाहेर शोधणारे तिघेही आत धावत आले.
“आग लागली ........आग लागली ..........आग लागली.........”
अलफाज रडत ओरडत होता.
झाला प्रकार लक्षात आल्यावर सगळेचजण हसायला लागले.
          अम्मीला हसताना पाहून अलफाजला तेवढ्यात ही बरं वाटलं ...सर्वाना पाहून त्याचा आवाज जास्तच वाढला . आता शेजारी पाजारी गोळा होतात की  काय असं वाटायला लागलं.
अम्मीने डोळा धुवून अलफाजला शांत केलं . सगळेजण अजून हसत होते.
अलफाज अम्मीला जाम चिकटला होता तिच्या गळ्यातच पडला होता.त्याने हळूच झंडू बामच्या बाटलीकडे पहिले.
तीही हसतेय असंच वाटलं त्याला.

त्याने हसून पाहताच तिने त्याला डोळा मारला.

अलफाज अजून हसला व अम्मीला चिकटला .......
रागावलेली अम्मी त्याला आता सोडणार नव्हती...
अलफाज व झंडू बामची बाटली ......दोघंही मनोमन हसत होते..........
                                          @@@@@
                                                  फारूक काझी.