Search This Blog

Sunday, 20 December 2015

अनवट वाटांच्या राहगीर ....!!! -प्राचार्य लीलाताई पाटील.




# मला भेटलेल्या लीलाताई ....
                                    खरं तर लीलाताईची भेट ही माझ्या जीवनातील एक मोठा बदल घडवणारी गोष्ट ठरली. मी डी.एड.ला असताना ताईंची एक दोन पुस्तकं वाचली होती. तेव्हा शिक्षक म्हणून स्वत:ची भूमिका कुठं मूळ धरू लागली होती. शिक्षक झाल्यानंतर झपाटून जाऊन लीलाताईंना वाचून काढलं. मला माझं शिक्षकपण समजून घ्यायचं होतं. एक शिक्षक म्हणून मला स्वत:ला सिद्ध करायचं होतं.२००७ पासून लीलाताईशी पत्रव्यवहार सुरु झाला. फोनवरही बोललो. ताई खूप कडक शिस्तीच्या आहेत जरा जपून वाग. असा प्रेमळ सल्ला मला मित्रांकडून मिळाला होता. त्याचा अनुभव मी घेतलाही. परंतु ताईनी खूप जीव लावला आणि तालमीत तयार करायलाही सुरवात केली. ताईंची भेट मंजे प्रत्यक्ष कार्यशाळाच झाली होती माझ्यासाठी. अंतरामुळे मला वारंवार कोल्हापूरला जाणे शक्य होत नसे. तरी त्या मला फोनवर अभ्यास देत व त्या हक्काने करवून घेत. त्यांचे डोळे खूप तेज असलेले व सतत कशाचातरी शोध घेत असलेले आहेत. त्या समोरच्या माणसाचं अंतरंग वाचत असतात.परंतु मधूनच एखादा मिश्कील विनोद करून हसवतील ही. “तुम्ही फार आळशी आहात .!”.हे माझ्याविषयीचं त्यांचं मत तंतोतंत बरोबर आहे.
                                    शिस्तबध्द लीलाताईच्या आत लपलेल्या एका प्रेमळ शिक्षिकेला मी सतत भेटत आलोय. कोणतंही काम नियोजनपूर्वक व पूर्वतयारीने कसं करावं याचा त्या वस्तुपाठच मला देत असत. त्यांच्या संपर्कातील काही लोक [माझ्यासकट] अगदी त्रासून जात ,परंतु त्या आपला हट्ट सोडत नसत. लीलाताईना नेहमी वाटे चांगलं काम करणारे शिक्षक महाराष्ट्रभर पसरलेले आहेत,त्यांना एकत्र आणायला हवं. छोटे छोटे दिवे एकत्र आणले तर त्यांची मशाल बनेल व त्यांचा प्रकाश एक नवीन वाट निर्माण करेल. आम्ही सांगोल्यात २००८ साली माताबालक उत्कर्ष प्रतिष्ठान यांच्या सोबत व श्री. संजय मालपाणी यांच्या सहकार्याने शिक्षकांची दोन दिवसांची कार्यशाळा घेतली. आणि मग समविचारी शिक्षकाना एकत्र आणण्याचं काम सुरु झालं. आज whatsapp मुळे हे काम अधिक सोप्पे झाले आहे. ताईंच एक स्वप्न प्रत्यक्षात येत आहे.

# शिकण्याचा हक्क जोपासणारी विद्यालये हवीत.
                                   लीलाताई आपल्या पुस्तकातून नेहमी हीच भूमिका मांडत आल्या आहेत. ‘शिकणे म्हणजे स्वातंत्र्य मिळवणे’ या कार्व्हर च्या विचारांशी त्या एकजीव होतात. मुलांना जसा इतर गोष्टींचा हक्क असतो तसाच तो शिकण्याचा ही असावा असं त्यांचा सतत आग्रह असे. त्यामुळेच की काय ‘सृजन आनंद विद्यालयातील’ मुलांना स्वतंत्रपणे विचार करायला लावणे,चिकित्सा करणे, कार्यकारण भाव शोधणे इत्यादी सवयी अगदी लहान वयापासून लागाव्यात यासाठी त्यांचा आग्रह राहिला आहे.
वार्गातील वातावरण हे लोकशाही पध्दतीचं असावं, शिक्षकांनी हुकुमशहा न बनता मुलांचे मित्र ,सहयोगी बनून काम करावं. अध्यापनातला आनंद घ्यावा. अध्यापनाची सुंदर व्याख्या त्या करतात. “अभ्यासक्रम आणि क्रमिक पुस्तक यांचा एकूण आवाका लक्षात घेऊन शिक्षकानं सभोवतालच्या वास्तवाची केलेली उपसाउपस ,उकल आणि सांधेजोड म्हणजेच अध्यापन होय.”
                                    त्या जिथं शिक्षण घडतं त्याला शाळा म्हणत नाहीत. उलट ही सृजन व आनंद पेरणारी विद्यालये आहेत...असं त्या सतत मांडत असतात. हे शिकणं म्हणजे नेमकं काय ? तर ...”सकस व प्रयोगशील शिक्षणाचं मुख्य ध्येय माणूसपण जागवणं, शिकतेपणाच्या विविध अंगांना खतपाणी घालून अध्यानोत्सुक मन तयार करणं” [शिक्षणातील लावण्य.] याचाच अर्थ असं की केवळ घोका व परिक्षा नावाच्या काही तासाच्या कसोटीत ते ओका इतकंच शिक्षण नाही. हे बादलीभरू शिक्षण जे केवळ एकाच छापाचे विध्यार्थी तयार करते..”माणूस व माणूसपण “ नव्हे. शिक्षणाची ही रूळलेली चौकट मोडून नव्या पायवाटा निर्माण करणं हेच शिक्षकाचं ध्येय असायला हवं. त्यातूनच शिकण्याचा हक्क जोपासणारी विद्यालये तयार होतील.


# सृजन आनंद विद्यालयाची जन्मकथा.....
                                     “ही शाळा का केली?” असा प्रश्न लीलाताईंना नेहमी विचारला जातो.याविषयी काही बाबी त्यांनी त्यांच्या नव्या पुस्तकात [प्रवास ध्यासाचा...आनंद सृजनाचा ,२०१२] लिहिल्या आहेत. अधिकारी –प्राचार्य,प्रयोगशील शिक्षिका ..या सर्व प्रवासातलं वाचन, मनन,चिंतन आणि अनुभव या सर्वांचा परिणाम म्हणून त्यांच्या मनात सतत एक स्वप्न विलसत होतं. ते होतं लोकशाही मार्गाने चालणारी व प्रत्येक मुलाचं स्वातंत्र्य जपणारी आणि शिकण्याची लालसा निर्माण करणारी शाळा त्यांना उभारायची होती. ‘हाताची घडी तोंडावर बोट’ यामुळे पाठ्यपुस्तक व परीक्षा यांच्या आवर्तनात भिरभिरताना प्राथमिक शाळेतील पोरांना आपलं औत्सुक्य कोंडून ठेवावं लागतं.तेच स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी सृजन आनंद वर्ग सुरु केला. पत्ता ,सौरभ,रुईकर कॉलनी ,कोल्हापूर. म्हणजे ताईंचं राहतं घर. सुरवातीला काही प्रयोग करून ‘सृजन आनंद विद्यालय’ सुरु झालं. त्या एवढंच करून राहिल्या नाहीत तर सृ.आ.वि. हे प्रयोगशीलतेचं बेट होऊ नये,तर हे प्रयोग सार्वत्रिक व्हायला हवेत यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात. त्यांचं लेखन, त्यांची पुस्तके, व्याख्याने यातून केवळ अन केवळ गुणवत्तापूर्ण तसेच जगण्याचा भाग बनणारं शिक्षण हाच विषय असतो. आजही ही “ ८८ वर्षांची तरूण शिक्षिका’ त्या ध्यासापायी धडपडते आहे.
                                  ‘ सृजन आनंद विद्यालयाच्या’ जन्मकथेला एक दुखरा कोपराही आहे. लीलाताई एकीकडे कुटुंबाची जबाबदारी सांभाळत होत्या दुसरीकडे आपली प्रशासकीय सेवा निभावत होत्या. या सर्वांत कुठे ना कुठे त्यांच्याकडून ‘श्रीरंग’ त्यांचा एकुलता एक मुलगा याच्याकडे दुर्लक्ष होत राहिलं.त्याचं बालपण त्याना अनुभवता आलं नाही.अगदी लहान वायात पोक्त झालेला श्रीरंग कशासाठीही हट्ट करत नसे हा श्रीरंग ऐन तारुण्यात अपघातात मरण पावला. लीलाताईंच्या मनाला ह्या ओरखडयाची जखम कायम सलत राहिली. अजाणतेपणी आपण श्रीरंगवर अन्याय केल्याची रुखरुख त्यांना खात राहिली.त्याची भरपाई म्हणून मुलांसाठी काहीतरी करावं ही अस्वस्थता शांत बसू देईना.त्यातून ‘सृआवि’ ची पायाभरणी सुरु झाली. ‘प्रवास ध्यासाचा...आनंद सृजनाचा’ या पुस्तकात याबाबत सविस्तर लिहिलं आहे ताईंनी.


# शिक्षकमाणूस .......
                                       व्यवहारात आपण नेहमी ‘बाईमाणूस’, ‘गडीमाणूस’ असे शब्द वापरत असतो. परंतु शिक्षक हाही एक माणूस असतो हे आपण विसरत राहतो. त्यासाठी लीलाताई ‘शिक्षकमाणूस’ ही एक व्यापक संकल्पना मांडतात. ती केवळ शिक्षक एवढ्या पुरती मर्यादित राहत नाही..तर एक व्यापक संकल्पना बनते. जी कालातीत आहे. शिक्षकमाणूस म्हणून काय काय हवं......
१] मूल विचार करू शकतं यावर शिक्षकाचा विश्वास हवा.
२] मुलानाही हक्क आहे प्रश्न विचारण्याचा,टीका करण्याचा ,चुकीला ‘चूक’ असे निर्भयतेने म्हणण्याचा.
३] स्वत:च्या बुद्धीला जे पटतंय ते स्वीकारणे.
४] स्वत: सतत प्रयत्नशील असणं. अपयश येईल याची चिंता नको.
५] बालककेंद्रित, आनंददायी,सृजनशील व अनुभवजन्य अर्थपूर्ण शिक्षण देऊ शकणारा.
६] मुलांवर विश्वास हवा.
७] चाकोऱ्या मोडण्याचं धाडस व परिणाम सहन करण्याचं धैर्य.
८] ‘बदल घडतो....’ यावर दृढ विश्वास हवा.
९] आपल्या हाती असलेल्या साधनांत काय योग्य ,काय अयोग्य हे ठरविण्याचा अधिकार शिक्षकाला ह्वां.
१०] शिक्षकमाणसाने आपलं स्वातंत्र्य घ्यावं. ण घालून दिलेले नियम ही आपण पाळत राहतो. त्यातून बाहेर पडायला हवं.
११] इतर शिक्षकांशी सतत संवाशील असायला हवं.

लीलाताईची पुस्तकं ही असा शिक्षकमाणूस घडवणारं उत्तम माध्यम आहे.विशेषत: मराठी अध्यापन हा लीलाताईंचा जीव की प्राण.त्यात त्यांनी अनेक प्रयोग करून पाहिले.सृआवि त अश्या प्रायोगांना लिखित रूप देऊन ठेवलं गेलंय. ते मोठे साधन आहे. लीलाताई या जणू प्राथमिक शिक्षणाचं एक ‘स्वतंत्र विद्यापीठ’ आहेत. तरीही राजन गवस यांनी मात्र एक वाक्य वापरल्याचं आठवतंय. “लीलाताई म्हणजे एक कविता. जी महाराष्ट्राला कळाली नाही.” लीलाताईची फारशी दखल घेतली गेली नाही हेच यातून स्पष्ट होते.





ती नदी
ती शाळा





ती देते
ती घेते
ती प्रेम भरते
कधी कधी रागावते
स्वत: ला समजावते
आणि
तुम्हालाही..
ती अगदी स्वतंत्र असते....
खळाळते
तिचं स्वातंत्र्य
आणि तिचा प्रवास
या तिच्या जिवंतपणाच्या खुणा...
.
.
नदीकडून आपण शिकायचं
देणं आणि घेणं
प्रेम करणं आणि रागावणं
पण, विसरायचं कधीच नाही...
जिवंत असणं आणि खळाळणं
स्वतंत्र असणं आणि ...
प्रावास करणं....

.
.
-लीलाताई पाटील. [‘शिकण्याच्या वाटेवरचं आनंदवन’ मधून साभार.]
.
.
[सदर लेख डिसेंबर २०१५ च्या 'ऋग्वेद' मासिकात प्रसिद्ध झाला आहे. तसेच पूर्ण लेख वाचण्यासाठी भेट द्या. myworld/farukskazi.blogspot.com]

Thursday, 3 December 2015

आजचा‬ भाषिक खेळ
 
 
 

                     आज (02/12/2015)परिपाठाला सर्व मुलं येऊन बसली. चौथीतल्या प्रीतीने फळ्यावर पेपरमधील 'असहिष्णुता' हा शब्द लिहिला व प्राजक्ताला वाचायला लावला. वाचताना शब्दांबाबत पटकन आकलन न झाल्याने वाचनात अडखळणारी प्राजक्ता शब्द वाचताना अडखळली. नजरेच्या टप्प्यात आलेले शब्द तिला पटकन आकळत नाहीत परिणामी तिच्या वाचनावर परिणाम होतो. ती छान वाचते मात्र अपरिचित शब्दांजवळ मात्र ती घुटमळते व अडखळतेही.
आजही ती अडखळली.मी तिला फळ्यावर विष्णू हा शब्द लिहायला लावला.तिने तो लिहिला व वाचलाही.हा परिचित शब्द ती सहज वाचती झाली. मुलांची कुजबूज सुरू झाली.प्रयत्नांनी तिने 'असहिष्णु' हा शब्द वाचला. मला नेहमीच हे वाचनासंबंधीचे प्रश्न खुणावत राहतात.मी यावर एक खेळ खेळूया का हे सुचवलं...मुलं लगेच तय्यार झाली.....
                    "आज आपण 'ष' असलेले जोडाक्षरयुक्त शब्दांचा खेळ खेळायचा. अर्ध्या तासात शब्द शोधायचे ...अन ज्याने त्याने आपला शब्द फळ्यावर लिहायचा."
मुलं तयार झाली. सहसा मुलं शब्द सांगतात व शिक्षक तो फळ्यावर लिहितात. इथं मात्र तसं न करता मुलांनी स्वत: शब्द लिहिण्याची अट असल्याने लिहिण्याची मजा व चुका समजून घेणं सहज शक्य होतं. (मंजेच चुकीला फुल्ल माफी. 😃)
                   अर्ध्या तासात आम्ही जवळजवळ 70 शब्द शोधून फळ्यावर लिहिले तेही ज्याचा शब्द त्यानेच लिहावा या नियमाने. ते शब्द इथं देतोय.आपण त्यात वाढ करू शकता. व ते मला पाठवावेत ही विनंतीही करतो.
 
 

'ष'चे जोडाक्षरयुक्त शब्द...

1)चौंसष्ट , 2) अष्टचक्र, 3) आकर्षक ,4) सहिष्णुता ,5) असहिष्णुता ,6) कृष्ण ,7)वैष्णवी ,8) मनुष्य ,9) सष्य ,10) बाळकृष्ण ,11) आयुष्य ,12) साष्टांग नमस्कार ,13) गर्विष्ठ ,14) गोष्टी ,15) अडुसष्ट ,16) अष्टकार ,17) हर्षद ,18) उत्कृष्ठ ,19) अष्टप्रधान,20) गोष्ट ,21)पृष्ठ ,22) सरलष्कर , 23) पुष्कळ ,24) राष्ट्रपिता , 25) राष्ट्रवादी, 26) राष्ट्रवाद , 27) अष्टपैलू , 28) कोष्ठक , 29) आकृष्ट ,30) कष्टाळू ,31) नाष्टा , 32) विष्णू 33) कृष्णकांत ,34) अष्टविनायक , 35) उष्णता ,36) कष्ट , 37) दुष्काळ , 38) धनुष्य , 39) अष्टगंध , 40) मार्गशीर्ष ,41) महाराष्ट्र , 42) सदुसष्ठ , 43) संकष्टी , 44) निष्क्रिय ,45) पौष्टिक , 46) बाष्प , 47) राष्ट्र , 48) कष्टात , 49) अष्ट , 50) कृष्णा ,51) दुष्ट , 52) वर्षा ,53) भविष्यकाळ , 54) राष्ट्रवेदी , 55) षष्ठी , 56) कोष्टी , 57) भविष्य , 58) शीर्ष , 59) शीर्षक , 60) अष्टकोन , 61) सृष्टी , 62) दृष्टिकोन, 63) पुष्प , 64) पुष्पा , 65) स्पष्ट , 66) नष्ट , 67) कृष्णानदी, 68) राष्ट्रीय, 69) सहर्ष ,70) दृष्टी.
**
**
 #‎काही‬ नोंदी
..
1) इ.2री ते 4 थी पर्यंतच्या मुलांचा सहभाग.
2) मुलांचं वाचन वाढलेलं लक्षात आलं कारण यातील बरेच शब्द दैनंदिन जीवनाचा भाग नाहीत.
तरीही त्यांचा समावेश झालाय.
3) 'सष्य' हा शब्द कुठून आणला असं विचारलं तेव्हा तो 'वंदे मातरम ' मधे आहे असं दिगंबरने मत नोंदवलं.
4) शब्द लिहिताना मुलं-मुली चुकले नाहीत (एकदोन अपवाद) यावरून एक गोष्ट लक्षात आली की मुलं समजपूर्वक वाचत असतील तर लेखनात सहसा चुका होत नाहीत.
5) जोडाक्षराचे काही नियम उदाहरणातून समजून
घेता येतात. अक्षरांची रचना तसेच त्यांची लिखित चिन्हांकित रचना समजून घेता येते.
6) 'ष' लिहिताना त्याच्यातील तिरपी रेषा ही डावीकडून उजवीकडे तिरपी खालच्या दिशेला येते हे समजताच काही मुलांची पध्दत बदलली. उजवीकडून डावीकडे जाणारी रेषा देणं चुकतंय हे लक्षात येताच बदल सुरू झाला.सरावानं ते अजून पक्कं होईल.
7) मुलांनी वहीत या शब्दांची यादी केली तर मी तेच शब्द कार्डवर लिहायला घेतले. 70 शब्दांचं वाचन साहित्य तयार झालं. 😃
8) शब्दकार्डांमुळे गटातील शब्दांचं दृढीकरण शक्य आहे.त्यासाठी याच शब्दांच्या सरावासाठी विडियो निर्मितीचं काम हाती घेतलंय. तंत्रज्ञानाचा वापर करून सराव अधिक सुलभ होईल.
.9) फारशा परिचित नसलेल्या शब्दांची ओळख पटावी यासाठी हे उपयुक्त ठरलं. तसेच मुलांच्या स्मरणकोषातील शब्दांची साठवणूक होताना काय प्रक्रिया होते व त्यासाठी काय करता येईल हे लक्षात यायला मदत झाली.मूल अनुभवाशी संबंधित व उपयुक्त शब्दच लक्षात ठेवतं व अपरिचित शब्दांचं लेखन व वाचनही करताना हमखास चुकतं.
10) अशा उपक्रमात भाषिक खेळ व भाषा शिकण्याची मजा दोन्ही अनुभवता येते.

 
 

 **
फारूक एस.काझी
जि.प.प्रा.शाळा,अनकढाळ नं.1
ता.सांगोला ,जि.सोलापूर

Wednesday, 4 November 2015



 अलफाज डॉट कॉम ही मुलांसाठी लिहिलेली कथामालिका. पालकांना विनंती आहे, आपण या कथा मुलांना वाचून दाखवाव्यात. आपल्यानात्यातली मजा डब्बल होईल. आपली प्रतिक्रिया जरूर लिहा. [मुलांसाठी]

१] झंडू बाम.

             अलफाजची गाडी आज घरभर फिरून फिरून शांत झाली. अम्मीला काळजी पडली होती कि आज अलफाज एवढा शांत कसा ? अलफाज शांत मंजे काहीतरी गडबड निश्चितच आहे. हे आता सगळ्यांनाच कळू लागलं होतं.
             “अरे , आज अप्पू कुठं गेलाय ?” दादाजींनी हळूच विचारलं .खाटेखाली लपलेला अलफाज हे सगळं ऐकत होता. हसत होता. इतक्यात अम्मीही हाक मारू लागली ....”अरे अलफाज !! कुठ गेलाय माझं पिल्लू  ? कुठं शोधू  ? कहां हो बिट्टू ?”
             अलफाज खाटेखाली बसल्या बसल्या हसून सगळी मजा पाहत होता. दादाजी थकून बसले. त्यांनी ओळखलं होतं ... अलफाज खाटेखाली बसलाय ते..ते पुन्हा मजेने हाक मारत होते. आणि अलफाजचं हसू पाहून स्वत:ही खुश होत होते. दादीही ते पाहून हसत होत्या.
             अम्मीने अलफाज काय करतोय हे पाहण्यासाठी खाटेखाली डोकं घातलं . खाली अंधार होता. इतक्यात अलफाज “बव्वा ...!!!” असे ओरडला . अम्मी दचकून मागे सरकली. तिच्या डोक्याला खाटेची लोखंडी पट्टी लागली. खूप दुखलं तिला...डोळ्यात टचकन पाणी आलं . अलफाजला अंधारात ते दिसलं नाही. पण अम्मी काही न बोलता निघून गेलेली त्याला खटकलं ...तिने आपल्यावर रागवावं ,आपला गालगुच्चा घ्यावा..प्रेमाने गालाची पापी घ्यावी असं त्याला वाटत होतं . आपण ती पापी हाताने पुसल्यावर ती लटकेच रागावणार.........मग आपण हसायचं....अस्म काहीबाही त्यानं मनात ठरवलेलं.
            पण, अम्मी न बोलताच निघून गेल्याचं पाहून तो हळूच बाहेर डोकावला. आपल्या खोक्यातून टफी आपलं मुंडकं बाहेर काढून इकडचा –तिकडचा अंदाज घेतो तसंच त्याने केलं. चार पायावर चालत बाहेर आला.
“अम्मी...$$$अम्मी .... $$$!!”
अशा लाडात हाका मारत तो किचनमध्ये आला.
अम्मी कोपऱ्यात डोक्याला हात लावून बसलेली. डोळ्यात पाणी.
अलफाज पहिल्यांदा अम्मीला रडताना पाहत होता.
तो लाडतच अम्मीजवळ आला ....... “क्या हुआ अम्मी?”
त्याने अम्मीची पापी घेतली.
पण अम्मीने लक्ष दिलं नाही. तिने त्याला झिडकारलं .......
“जा जवळ येऊ नकोस माझ्या.....!!! किती त्रास द्यायचा रे .......! बोलू नकोस माझ्यासाठी...”
अम्मी उठून बाहेरचे कपडे आणायला गेली.
अलफाजला वाईट वाटले.
तो अम्मी अम्मी करत खूप वेळ मागे लागला .
अम्मीची ओढणी धरून ओढली. दादाजींना सांगितलं .....
पण, काही होईना....
अम्मी काही बोलेना..
अम्मी,  दादा-दादी  कामात आहेत हे पाहून अलफाज हळूच आतल्या खोलीत आला...
खुर्ची ओढून लहान कपाटातील झंडू बामची बाटली काढली.
ही बाटली घरातले मोठे लोक वापरतात .मी घेऊ नये म्हणून वर ठेवतात.
सर्दी झाली कि नाकाला लावतात हे औषध ....
डोकं दुखायला लागलं की दादीही डोक्याला लावतात.
अलफाजने टोपण काढलं ...आत औषध नव्हतच ....
“चूक.....आता कसं करायचं.....? पुरेल का एवढं आपल्याला...?”
अलफाजला सहज प्रश्न पडला.
त्याने बोटाने बाटली पुसून घेतली...व औषध नाकाला लावलं.
ते झणझणलं तसा तसा तो गडबडला.
या गडबडीत त्याचं बोट डोळ्याला लागलं..... झालं ........मग काय......???अलफाजचं गानं इतक्या जोरात सुरु झालं की बाहेर शोधणारे तिघेही आत धावत आले.
“आग लागली ........आग लागली ..........आग लागली.........”
अलफाज रडत ओरडत होता.
झाला प्रकार लक्षात आल्यावर सगळेचजण हसायला लागले.
          अम्मीला हसताना पाहून अलफाजला तेवढ्यात ही बरं वाटलं ...सर्वाना पाहून त्याचा आवाज जास्तच वाढला . आता शेजारी पाजारी गोळा होतात की  काय असं वाटायला लागलं.
अम्मीने डोळा धुवून अलफाजला शांत केलं . सगळेजण अजून हसत होते.
अलफाज अम्मीला जाम चिकटला होता तिच्या गळ्यातच पडला होता.त्याने हळूच झंडू बामच्या बाटलीकडे पहिले.
तीही हसतेय असंच वाटलं त्याला.

त्याने हसून पाहताच तिने त्याला डोळा मारला.

अलफाज अजून हसला व अम्मीला चिकटला .......
रागावलेली अम्मी त्याला आता सोडणार नव्हती...
अलफाज व झंडू बामची बाटली ......दोघंही मनोमन हसत होते..........
                                          @@@@@
                                                  फारूक काझी.
                                                                                                                                                     

Friday, 30 October 2015

"हो सर येतो तुमचा राग....!"


                    मागच्या महिण्यातली एक घटना.सकाळी परिपाठ संपवून सर्व मुलं वर्गात येऊन बसली. आज मुलांनी दुरेघीत लिहिलेलं 'शुध्दलेखन ' तपासण्याचा दिवस होता. चौथीच्या मुलांनी आता 'माध्यम भाषेतील लेखन नियम समजून घ्यायला हवेत.' या मताचा मी आहे तसेच शुध्दलेखन लिहिण्याने अक्षरात होणारी सुधारणा निश्चितच आनंद देणारी बाब असते.'सुंदर अक्षर म्हणजे दागिणा' असं मी म्हणणार नाही.परंतु सुंदर हस्ताक्षर ही एक कला आहे. ती अवगत होण्यासारखी आहे तर जरूर त्याचा सराव करायला हवा. शेवटी अक्षर खूप काही बोलतं.
            शुध्दलेखन तपासताना नयन समोर आला. बराच शांत पोरगा..! लिखान खूप छान करतो.आता वाचनही भरपूर करतोय. परंतु पठ्ठयाचं अक्षर मात्र अजूनही सुधरायचं नाव घेईना .मी तर ब-याचदा बोललो त्याच्याशी या संबंधी ...पण परिणाम काही दिसेना.मी भडकलो अन दरडावून बोललो.
तो निमूट उभा होता. मी त्याच्यावर चिडलो.शेवटी त्याची वही घेऊन जाता जाता मी त्याला प्रश्न केला.

 "नयना माझा राग येतो का रे ? मंजे मी चिडतो....खूप रागावतो
नयन हसला, "नाय सर,नाय राग आला."
तो सरळ सरळ खोटं बोलत होता.
केवळ माझं मन राखण्यासाठी .
शेवटी मी जोर लावून विचारलं तेव्हा तो म्हणाला ,"येतो तुमचा राग. तुमची सारखं अक्ष
रावरनं बोलता. मी चांगलं लिहलं तर चांगलं बोलता पण पुन्हा अक्षरावरनं खवळता."
इतक्यात दिगंबर पुढं आला.
"सर जरा बोलायचंय.बोलू का ?"
मी समजलो याला काहीतरी बोलायचंय.
"बोल पिल्या !"
"सर ,तुमी जवा हसता ,आमाला हसवता तवा लै भारी दिसता.पण जवा चिडता किंवा रागवता तवा लै वंगाळ दिसता "
पोरं हे ऐकून हसत होती.
मीही हसू लागलो.
पोरांचं निरीक्षण किती दांडगं असतं ! याची पुन्हा एकदा खात्री पटली.
"Sorry पिल्ल्यांनों! खरं तर तुमच्यासाठी चिडत होतो.तुमचा फायदा म्हणून रागवत होतो. पण मला पटलंय की मी चुकतोय.
मग मी काय करावं असं तुम्हाला वाटतंय ?की असे निर्णय तुम्ही बालसभेत घेणार. मंजे मला चिढावं लागणार नाही."
मुलं विचारात पडली.
"आम्ही चर्चा करून सांगतो"
मी ही कबूल झालो.


लंच ब्रेकनंतर मुलं एकत्र आली व म्हणाली," सर,आम्ही बालसभेत हा विषय घेतो.तुम्हाला त्रास नाही देणार.तुमी हसतानाच भारी दिसताय."


 मी शिक्षक म्हणून का एवढा समाधानी आहे याचं उत्तर या प्रसंगात दडलंय.
माझ्या वर्गात शिकणारी लहान लहान लेकरं हेच माझ्या हसण्याचं कारण...
हैच माझ्या शिक्षकमाणूस म्हणून समृध्द अन समाधानी असण्याचं गमक...एक विद्यार्थी म्हणूनही !!!


फारूक एस.काझी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,अनकढाळ नं.1
ता.सांगोला , जि.सोलापूर

Friday, 16 October 2015



     # शालेय वाचनालय : काही उपक्रम.

..
.. 
     ‘वाचन प्रेरणा दिवस’ साजरा करून झाला.या दिवशी अनेक शाळांतून ‘वाचनालये’सुरु झाली. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. खरं तर पुस्तकांचं हे विश्व मुलांसाठी खुलं करायला हवं. वाचनातून ‘समज’ तर वाढतेच त्याचबरोबर ‘आपली स्वत:शी ओळख’ व्हायला मदत मिळते. खूप सुंदर अनुभव असतो हा.
      याचसाठी एक छोटा प्रयत्न करून पाहतोय. आपल्या वाचनालयासाठी काही छोट्या कृती घेऊन आलोय. मज्जा आणि वाचनाचा आनंद एकत्र घेता येईल.आपणास आवडतील.यातील काही कृती मी स्वत: करून पहिल्या आहेत. काही कृती नव्याने करून पाहतो आहे.
..
..
# शिक्षकांसाठी थोडे.
     वाचनालयातील विविध कृती घेत असताना शिक्षक हा महत्त्वाचा दुवा ठरतो. त्यांनी हे नियोजन करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहेत. त्या खालीलप्रमाणे ...
     [१] उपक्रमाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर असायला हवं. अन्यथा बऱ्याच वेळा आपण काही कृती घेत राहतो मात्र उद्दिष्टे ठरवायला व ती आमलात आणायला विसरतो.
     [२] आपण पुस्तकाची निवड काळजीपूर्वक करायला हवी. आपल्या कृतीना अनुसरून त्यांची निवड करायला हवी.
उदा. कविता पूर्ण करा. या उपक्रमासाठी कवितासंग्रह निवडावा लागेल.
     [३] कृतींना अनुसरून मुलांचे लहान किंवा मोठे गट करावेत.
     [४] वाचन कृतींसाठी वर्गाची रचना अर्धगोलाकार हवी.
     [५] विद्यार्थ्यांध्ये स्पर्धा निर्माण होईल अशा कृती टाळाव्यात. उलट सर्वच मुलांना वाचनासाठी प्रोत्साहित करणाऱ्या, सहकार्य आणि शिकण्याच्या प्रक्रियेला चालना देणाऱ्या कृती असायला हव्यात.
     [६] बसण्यासाठी चटई, बस्कर किंवा बेंच असतील तर त्यांची रचना अर्धगोलाकार करावी.त्यामुळे होणारी आंतरक्रिया अधिक परिणामकारक होते.
     [७] मुलांना प्रोत्साहनासाठी टाळ्या,शाबासकी,कौतुक इ.चा वापर करावा.आपण हे लक्षात घ्यायला हवे की वाचानालाची कृती ही मुलांची वाचनाची आवड जागृत करणारी असायला हवी. त्यामुळे मुलाविषयी नकारात्मक भूमिका घेऊ नका व तशी भाषाही वापरू नका.
    [८] मुलांचा वयोगट व आवड इत्यादीचा विचार करूनच पुस्तकांची निवड करावी. लहान आकाराची भरपूर चित्रांची पुस्तके असावीत. जी मुलांना खूप आवडतात.तिसरी चौथीसाठी ठळक अक्षराची पण लहानच पुस्तक निवडावीत. आवडीनुसार पुस्तकं देता येतील.सक्ती करू नये.
..
आठवड्याला एक अशी कृती शेअर करत जाईन.
..
आणखी वाचत रहा  My World/farukskazi.blogspot.com  या माझ्या ब्लॉगवर...
फारूक एस.काझी.
नाझरा, ता.सांगोला,जि.सोलापूर.
८२७५४५९२७६