Search This Blog

Saturday, 4 June 2016


                     शिक्षक म्हणून काम करत असताना मी मुलांच्या लेखनावर दोन तीन वर्षे काम करत होतो.तो भाग होता "भाषेच्या अंगणात" या उपक्रमाचा.मूल व्यक्त होत असतं ते ना ना माध्यमातून. मी लिखित माध्यमातून त्यांची अभिव्यक्ती शोधत होतो.एकदम छोटा उपक्रम. साधारण तिसरी चौथीच्या मुलांसोबत केलेला. खूप रंग पाहता आले भाषेचे. त्यातून मी मूल समजून घ्यायला शिकत गेलो. त्यांचे विचार, भावना, त्यांच्या एकंदरीत जाणीव व व्यक्तिमत्त्वाच्या घडणीतील काही बाबी समजू लागल्या होत्या.
                   हा एक प्रयत्न होता मुलांना स्वत:च्या भाषेत व्यक्त होण्याची संधी देण्याचा. मेई ती संधी दिली. अन एक सुंदर भाषिक अनुभव मला घेता. २०१४ च्या ' Active Teacher Forum" च्या शिक्षक संमेलनात मला या उपक्रमाचं सादरीकरण करण्याची संधी मिळाली. तिथे MKCL प्रस्तुत व 'सह्याद्री" वाहिनीवरून प्रसारित झालेल्या "माझी शाळा" च्या टीमने लाइव्ह रेकॉर्डिंग केलं होतं. त्यातून आकाराला आला तो माझी शाळा मधील "भाषेच्या प्रांगणात" हा भाग. अगदी छोट्याश्या वस्तीवर झालेलं हे काम माझी शाळा या मालिकेतून येणं हा क्षण खूप मोठा आनंद देणारा होता.
                  मित्रहो, मूल स्वत:ची भाषा शाळेत घेऊन येतं, त्याचा आदर करणे हे आपलं पाहिलं कर्तव्य. त्याच्या आनंदात सहभागी होण्याची संधी. हा विडीयो पाहुन जरूर लक्षात येईल की मूल किती तऱ्हेने व्यक्त होत असतं. भाषेचा गोडवा काय असतो.    [विडीयो सौजन्य : MKCL, माझी शाळा, सह्याद्री वाहिनी.]


भेट

                    ७ मे. शाळेचा शेवटचा दिवस. एक वर्ष संपलं. खरं तर नियमानुसार निकाल १ मे ला द्यायचा. पण मी यावर्षी तो राखून ठेवला अन ७ मे ला देईन असं सांगितलं. माझ्याकडे दुसरी व चौथी असे वर्ग होते. दुसरीची मुलं तिसरीसाठी माझ्याकडे असणार होती. पण चौथीच्या मुलांना बाहेर जावं लागतं. त्यांची अधून मधून भेट होणार होती पण का कुणास ठाऊक पण यावेळी मला त्यांना शेवटच्या दिवशी भेटायचं होतं. चौथीच्या मुलांचे हायस्कूलमध्ये पाचवीचे तास सुरु होणार होते.
                      ७ तारखेला सकाळी चौथीतल्या प्रीतीचा फोन आला. “सर, आम्ही साडे अकरापर्यंत येतो .तुम्ही आम्हाला भेटल्याशिवाय जाऊ नका.” मी होकार दिला. तसं तर आजवर असे बारा वर्षांचे शेवटचे निरोप घेतलेत मुलांचे. तसाच हाही एक असं समजून मी शाळेला गेलो. अकरा वाजता मुलं आली. हसणं, चेष्टा-मस्करी, गप्पा, हायस्कूलमध्ये घडत असलेल्या गमती-जमती अन तक्रारी हे सर्व सुरु झालं. पाहता पाहता साडेबारा झाल्या. मी म्हणालो, “ पोरानो, चला फार उशीर झाला. सकाळी गेलाय तुम्ही शाळेला. भूक लागलीय की नाय?”
“थांबा की व सर, आमी एवडं तुमाला भेटायला आलुया आन तुमी मजी चला चला करताय!” प्राजक्ता तिच्या नेहमीच्या फक्कड स्टाईलमध्ये बोलली. मला का कुणास ठाऊक क्षणभर गलबलून आलं. आम्ही परत गप्पात रंगून गेलो. मुलं अजूनही अवती-भोवती घुटमळत होती.
“सर, आपल्या इथं लई मज्जा इती बगा. तसं कुटंबी वाटत न्हाय”
मुलांच्या ह्या मायेवर तर शाळा अन शिक्षणाचा डोलारा उभा आहे. वाट मळती राहतीय. ऊन वाढू लागलं तसं मी मुलांना घरी जायला आग्रह केला. मुलं अजून रेंगाळतच होती.
मी वर्गाला कुलूप लावलं अन बाहेर आलो. का कुणास ठाऊक माझी अवस्थाही मुलांसारखीच झाली होती. पाय निघत नव्हता. परत परत मी शाळेकडे वळून पाहत होतो. मला किंचितही कल्पना नव्हती की आजचा दिवस हा माझा या शाळेतील शिक्षक म्हणून ‘शेवटचा दिवस’ होता. ही माझी शेवटची भेट होती. जड मनानं मी बाहेर पडलो.
        सुट्ट्यात बदल्या झाल्या. मीही बदलून गेलो. कुणालाच कल्पना नाही दिली. आता नवीन प्रवास करायचा होता. नवीन शाळा, नवीन सहकारी, नवीन स्वप्नं अन नवनवीन प्रयोग. माझी जुनी शाळा, मुलं गावकरी यांचं प्रेम सोबत घेऊन हा प्रवास सुरु झाला. भरभरून दिलं मला सर्वांनी. गावकरी, पालक, आणि सर्वांत जास्त माझ्या शाळेतल्या त्या सर्व चिमुरड्यांनी.मी चांगला शिक्षक आहे की नाही माहित नाही. पण मी नेहमी चांगला शिक्षक बनण्याचा प्रयत्न करत आलो. करत राहीन. कारण ते एकच मोठं स्वप्न माझ्या डोळ्यात सतत तरळत असतं. त्यातून मी लिहिता होतो. मांडत राहतो. आता नव्या प्रवासात नवीन स्वप्नं सोबत घेतलीत. पूर्ण करायला झटत राहीन.
            जीवनात आधार अन विरह देणाऱ्या भेटी, घडत रहायला हव्यात. त्यातून जगण्याची मजा कळत जाते. बेचव आयुष्याला ‘चव’ येत जाते.