भेट
७
मे. शाळेचा शेवटचा दिवस. एक वर्ष संपलं. खरं तर नियमानुसार निकाल १ मे ला द्यायचा.
पण मी यावर्षी तो राखून ठेवला अन ७ मे ला देईन असं सांगितलं. माझ्याकडे दुसरी व
चौथी असे वर्ग होते. दुसरीची मुलं तिसरीसाठी माझ्याकडे असणार होती. पण चौथीच्या
मुलांना बाहेर जावं लागतं. त्यांची अधून मधून भेट होणार होती पण का कुणास ठाऊक पण
यावेळी मला त्यांना शेवटच्या दिवशी भेटायचं होतं. चौथीच्या मुलांचे हायस्कूलमध्ये
पाचवीचे तास सुरु होणार होते.
७ तारखेला सकाळी चौथीतल्या
प्रीतीचा फोन आला. “सर, आम्ही साडे अकरापर्यंत येतो .तुम्ही आम्हाला भेटल्याशिवाय
जाऊ नका.” मी होकार दिला. तसं तर आजवर असे बारा वर्षांचे शेवटचे निरोप घेतलेत
मुलांचे. तसाच हाही एक असं समजून मी शाळेला गेलो. अकरा वाजता मुलं आली. हसणं,
चेष्टा-मस्करी, गप्पा, हायस्कूलमध्ये घडत असलेल्या गमती-जमती अन तक्रारी हे सर्व
सुरु झालं. पाहता पाहता साडेबारा झाल्या. मी म्हणालो, “ पोरानो, चला फार उशीर
झाला. सकाळी गेलाय तुम्ही शाळेला. भूक लागलीय की नाय?”
“थांबा
की व सर, आमी एवडं तुमाला भेटायला आलुया आन तुमी मजी चला चला करताय!” प्राजक्ता
तिच्या नेहमीच्या फक्कड स्टाईलमध्ये बोलली. मला का कुणास ठाऊक क्षणभर गलबलून आलं. आम्ही
परत गप्पात रंगून गेलो. मुलं अजूनही अवती-भोवती घुटमळत होती.
“सर,
आपल्या इथं लई मज्जा इती बगा. तसं कुटंबी वाटत न्हाय”
मुलांच्या
ह्या मायेवर तर शाळा अन शिक्षणाचा डोलारा उभा आहे. वाट मळती राहतीय. ऊन वाढू लागलं
तसं मी मुलांना घरी जायला आग्रह केला. मुलं अजून रेंगाळतच होती.
मी
वर्गाला कुलूप लावलं अन बाहेर आलो. का कुणास ठाऊक माझी अवस्थाही मुलांसारखीच झाली
होती. पाय निघत नव्हता. परत परत मी शाळेकडे वळून पाहत होतो. मला किंचितही कल्पना
नव्हती की आजचा दिवस हा माझा या शाळेतील शिक्षक म्हणून ‘शेवटचा दिवस’ होता. ही
माझी शेवटची भेट होती. जड मनानं मी बाहेर पडलो.
सुट्ट्यात बदल्या झाल्या. मीही बदलून
गेलो. कुणालाच कल्पना नाही दिली. आता नवीन प्रवास करायचा होता. नवीन शाळा, नवीन
सहकारी, नवीन स्वप्नं अन नवनवीन प्रयोग. माझी जुनी शाळा, मुलं गावकरी यांचं प्रेम
सोबत घेऊन हा प्रवास सुरु झाला. भरभरून दिलं मला सर्वांनी. गावकरी, पालक, आणि
सर्वांत जास्त माझ्या शाळेतल्या त्या सर्व चिमुरड्यांनी.मी चांगला शिक्षक आहे की
नाही माहित नाही. पण मी नेहमी चांगला शिक्षक बनण्याचा प्रयत्न करत आलो. करत राहीन.
कारण ते एकच मोठं स्वप्न माझ्या डोळ्यात सतत तरळत असतं. त्यातून मी लिहिता होतो.
मांडत राहतो. आता नव्या प्रवासात नवीन स्वप्नं सोबत घेतलीत. पूर्ण करायला झटत
राहीन.
जीवनात आधार अन विरह देणाऱ्या भेटी,
घडत रहायला हव्यात. त्यातून जगण्याची मजा कळत जाते. बेचव आयुष्याला ‘चव’ येत जाते.
No comments:
Post a Comment