Search This Blog

Sunday, 17 December 2017



                                      अब्बूंना पत्र.....
                                                                       फारूक एस.काझी.
                                                                                नाझरा, ता.सांगोला, जि.सोलपूर
                                                                                                  ९९२१३८०९६६
                                                                                  farukskazi82@gmail.com

                    वाहिद आज खूप उदास होता. आज त्याच्या रिझल्टचा दिवस. त्याच्या सगळ्या मित्रांचे अब्बू त्यांचे रिझल्ट न्यायला आले होते. पण वाहिदचं कुणीच आलेलं नव्हतं. त्याच्या अब्बूना जाऊन दोन वर्षं झाली होती. भारतीय सैन्यात असलेले त्याचे अब्बू शत्रूशी लढता लढता शहीद झाले होते.
सर्वांच्या अब्बूंना आलेलं पाहून त्याला त्याच्या अब्बुंची खूप आठवण आली. डोळ्यातून पाणी वाहू लागलं. त्याने घाईने ते पुसलं आणि तो त्याच्या अम्मीची वाट पाहू लागला. त्याची अम्मी नोकरी करायची. ती कारखान्यातून अर्धी सुट्टी काढून येणार होती. तिच्या समोर आपण रडलो तर तिला किती वाईट वाटेल. नाही मी नाही रडणार असं त्याने स्वत:ला समजावलं. इतक्यात त्याची अम्मी आली.
                 आल्या आल्या तिने वाहिद्च्या डोक्यावरून हात फिरवला. त्याची एक पापी घेतली. वाहिदने आपलं मार्क्ससीट अम्मीच्या हाती दिलं. सर्वच विषयात अव्वल. अम्मीच्या डोळ्यात पाणी आलं.
“सलीमाताई, खूप खूप अभिनंदन !”
वाहिद्च्या अम्मीने मान वर करून पाहिलं. वाहिद्च्या बाई समोर उभ्या होत्या.
“नमस्कार बाई.”
“अभिनंदन ! यावर्षीही वाहिदनं सर्व विषयात अव्वल श्रेण्या मिळवलेत.”
“शुक्रिया बाई. आज संध्याकाळी चहाला या घरी. आम्ही वाट पाहतो.”
“हो, येईन मी.चला निघते. वाहिद,अशीह प्रगती कर बाळा. आणि आपल्या अम्मीचं नाव खूप मोठ्ठं कर. येते.”
वाहिदने  हात हालवून बाईना निरोप दिला. दोघेही घरी जायला निघाले.
“आज तुझे मेरी तरफ से आईस्क्रीम !”
वाहिद खुश झाला. त्याला अजून काहीतरी हवं होतं.
“अम्मी, बीस रुपय हैं क्या?”
अम्मीने पैसे दिले. वाहिद पळतच शेजारच्या दुकानात गेला. काहीतरी खरेदी करून परत आला. अम्मीने नाही विचारलं त्याला की त्याने काय आणलं म्हणून. वाहिदवर जितकं प्रेम तितकाच विश्वास होता त्यांचा.उरलेले पाच रुपये त्याने अम्मीला परत केले. दोघेही घरी आले.
        संध्याकाळी बाई आल्या. त्यांच्या गप्पा चाललेल्या. वाहिद त्यांना भेटून आतल्या खोलीत जाऊन बसला. त्याने एका कागदावर पत्र लिहायला घेतलं. पत्र लिहून झालं. त्याने दुकानातून आणलेल्या लिफाफ्यात   पत्र टाकलं. चिकटवलं. मागे आपला पूर्ण पत्ता टाकला. पपत्रावर पत्ता टाकताना तो अडखळला.

यासीन शेख,
मु.पो. अल्लाचं घर, आकाश.

त्याने पत्राला दुकानातून आणलेले दोन्ही मोठे फुगे फुगवून लिफाफ्याला  दोन्हीकडे  बांधले.
“अम्मी, मै बाहर जा रहा.” असं म्हणून तो बाहेर पळाला. मैदानावरून फुगे दूरवर जातील असा त्याचा अंदाज होता. मैदानावरच्या टेकडीवरून त्याने फुगे सोडून दिले.
पत्र अब्बूना मिळेल अन ते आपल्याला उत्तर पाठवतील.
त्याचे डोळे सतत पोस्टमनकाकाकडे लागलेले असत.
आता तो  उत्तराची वाट पाहत होता.
##########
वाऱ्याबरोबर फुगा व पत्र दूरवर उडत गेले. एका काटेरी फांजरीला अडकून एक फुगा फुटला.वारा पडला आणि पत्र हळूहळू खाली आलं. गावाकडे येत असलेल्या एका मोटरसायकल चालवणाऱ्या माणसाच्या अंगावर येऊन पडलं. त्यांनी गाडी बाजूला घेतली व काय आहे ते पाहिलं. त्यातला लिफाफा फाडून त्यांनी वाचायला सुरवात केली.

प्यारे अब्बू,
अस्सलमुअलैकुम .
                      दोन वर्षं झाली तुम्ही मला एकदाही भेटला नाही. ना पत्र ना फोन. अब्बू रागावलात का ? तुम्ही रागावला की मी तुम्हाला एक गोड गोड पापी द्यायचो. तुमची मिशी टोचवून तुम्ही मला तंग करायचा. मला नाही आवडायचं ते. अब्बू आता मी कुणाची पापी घेणार ? मला तुम्ही मिशी टोचवली तरी राग नाही येणार. तुम्ही कुठं आहात अब्बू ? मला तुमची खूप याद येते. अम्मी एकटी असताना रडते. माझ्यासमोर नाही रडत. मला काय वाटेल ? असाच ती विचार करत असणार.
                     अब्बू, आज माझा रिझल्ट आला. मागच्या वर्षी सारखं याही वर्षी मी अव्वल आलोय. तुम्हाला मार्क दाखवायचे होते. तुम्ही लवकर परत या. मग मी तुम्हाला ते दाखवतो. आपण छोटी पार्टी करू.मला आता छान लिहिता येतंय.
                      अब्बू तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी अम्मीला आजीबात त्रास देत नाही. तुम्ही पत्र मिळताच लवकर या. जेवण करत जा.तिथं तुमची आवडती बिर्याणी मिळते का? अम्मी जेव्हा बिर्याणी बनवते , किचनमध्ये रडत बसते. तिला तुमची याद येत असेल. अब्बू, लवकर या. लोक म्हणतात अल्लाहच्या घरून कुणी परत येत नाही. पण मला खात्रीय तुम्ही आपल्या वाहिदचं टाळणार नाही.
                     अब्बू, याल ना परत ? मी वाट पाहतोय.
                                       खुदा हाफिज.
                                                                           तुमचाच लाडला,
                                                                                   वाहिद.


                                            ############
पत्र वाचून होताच त्या माणसाने बाहीने आपले डोळे पुसले. त्याचा हात थरथरत होता.
त्याने मनाशी एक निश्चय केला. त्याने पत्र आपल्या बॅगेत ठेवलं. तो आपल्या गावाकडे रवाना झाला.
                                            ############


                      काही दिवसांनी वाहिद्च्या घरी एक पत्र आलं. मोठा लिफाफा असलेलं ते पत्र.
वाहिद्ला जन्नत दोन बोटं उरली होती. त्याने घाईत पत्र उघडलं. ते पत्र कधी एकदा उघडून वाचतोय असं त्याला झालं होतं. वरती नाव त्याचंच होतं. मागे पाठवणाऱ्याचा पत्ता लिहिला होता.
यासीन शेख,
मु.पो. अल्लाचं घर, आकाश.

प्यारे वाहिद,
                 अस्सलमुअलैकुम .
                            तुझं पत्र मिळालं. आम्हाला अल्लाहच्या घरून एकच पत्र पाठवण्याची परवानगी असते. त्यामुळे हे माझं पहिलं आणि शेवटचं पत्र. तू तुझ्या वर्गात अव्वल आलास हे वाचून मला खूप आनंद झाला. मी तिथं असायला हवं होतं. पण लोक म्हणतात ते खरं आहे. अल्लाहच्या घरून कधीच कुणी परत येत नाही. मलाही येता येणार नाही.
                           तू  माझा समझदार बाबा आहेस. खूप शिक, मोठा हो. अम्मीला कधीच त्रास देऊ नको. तिची काळजी घे. तूच तिचा आधार आहेस.अन ती तुझा आधार आहे. ऐकशील ना अब्बुचं ?
तू खूप मोठा व्हावास हे माझं स्वप्न आहे. अब्बुचं स्वप्न पूर्ण करशील ना?
                          अम्मीची काळजी घे, आनंदात राहा. अब्बू नाहीत याचं दु:ख करत बसू नको. मला जे काही सांगावसं वाटतं ते अम्मीला सांगत जा. कारण तुझं पत्रही मला मिळणार नाही. अम्मीच तुझे अब्बू अन तीच तुझी अम्मी. खूप मोठा हो. अम्मीची काळजी घे.

अल्लाह हाफिज.
                                                                                     तुझाच,
                                                                                      अब्बू.

                                                                      ############
          पत्र वाचून होताच वाहिदने एकदा आकाशाकडे पाहिलं. डोळ्यात पाणी  साठू लागलं होतं. पण आता रडायचं नाही. आता खूप मोठ्ठं व्हायचं. वाहिदने पत्र लपवून ठेवलं. तो अम्मीलाही हे सांगणार नव्हता. अब्बूंचं पत्र  फक्त त्याचं होतं.
          “अम्मी, मी खेळायला जातोय. तासाभरात परत आलो की अभ्यास करायला बसेन.”
अम्मी आश्चर्याने वाहिदकडे पाहत होती. वाहिद अचानक कसा काय एवढा बदलला ,याचं आश्चर्य तिला वाटू लागलं होतं. त्याचं कारण फक्त वाहिद्ला माहित होतं, आणि तुलाही. वाहिद्च्या अम्मीला हे नाही सांगायचं बरं का !! हे आपलं सिक्रेट.
.............................................................................................................................................

No comments:

Post a Comment