Search This Blog

Friday, 30 October 2015

"हो सर येतो तुमचा राग....!"


                    मागच्या महिण्यातली एक घटना.सकाळी परिपाठ संपवून सर्व मुलं वर्गात येऊन बसली. आज मुलांनी दुरेघीत लिहिलेलं 'शुध्दलेखन ' तपासण्याचा दिवस होता. चौथीच्या मुलांनी आता 'माध्यम भाषेतील लेखन नियम समजून घ्यायला हवेत.' या मताचा मी आहे तसेच शुध्दलेखन लिहिण्याने अक्षरात होणारी सुधारणा निश्चितच आनंद देणारी बाब असते.'सुंदर अक्षर म्हणजे दागिणा' असं मी म्हणणार नाही.परंतु सुंदर हस्ताक्षर ही एक कला आहे. ती अवगत होण्यासारखी आहे तर जरूर त्याचा सराव करायला हवा. शेवटी अक्षर खूप काही बोलतं.
            शुध्दलेखन तपासताना नयन समोर आला. बराच शांत पोरगा..! लिखान खूप छान करतो.आता वाचनही भरपूर करतोय. परंतु पठ्ठयाचं अक्षर मात्र अजूनही सुधरायचं नाव घेईना .मी तर ब-याचदा बोललो त्याच्याशी या संबंधी ...पण परिणाम काही दिसेना.मी भडकलो अन दरडावून बोललो.
तो निमूट उभा होता. मी त्याच्यावर चिडलो.शेवटी त्याची वही घेऊन जाता जाता मी त्याला प्रश्न केला.

 "नयना माझा राग येतो का रे ? मंजे मी चिडतो....खूप रागावतो
नयन हसला, "नाय सर,नाय राग आला."
तो सरळ सरळ खोटं बोलत होता.
केवळ माझं मन राखण्यासाठी .
शेवटी मी जोर लावून विचारलं तेव्हा तो म्हणाला ,"येतो तुमचा राग. तुमची सारखं अक्ष
रावरनं बोलता. मी चांगलं लिहलं तर चांगलं बोलता पण पुन्हा अक्षरावरनं खवळता."
इतक्यात दिगंबर पुढं आला.
"सर जरा बोलायचंय.बोलू का ?"
मी समजलो याला काहीतरी बोलायचंय.
"बोल पिल्या !"
"सर ,तुमी जवा हसता ,आमाला हसवता तवा लै भारी दिसता.पण जवा चिडता किंवा रागवता तवा लै वंगाळ दिसता "
पोरं हे ऐकून हसत होती.
मीही हसू लागलो.
पोरांचं निरीक्षण किती दांडगं असतं ! याची पुन्हा एकदा खात्री पटली.
"Sorry पिल्ल्यांनों! खरं तर तुमच्यासाठी चिडत होतो.तुमचा फायदा म्हणून रागवत होतो. पण मला पटलंय की मी चुकतोय.
मग मी काय करावं असं तुम्हाला वाटतंय ?की असे निर्णय तुम्ही बालसभेत घेणार. मंजे मला चिढावं लागणार नाही."
मुलं विचारात पडली.
"आम्ही चर्चा करून सांगतो"
मी ही कबूल झालो.


लंच ब्रेकनंतर मुलं एकत्र आली व म्हणाली," सर,आम्ही बालसभेत हा विषय घेतो.तुम्हाला त्रास नाही देणार.तुमी हसतानाच भारी दिसताय."


 मी शिक्षक म्हणून का एवढा समाधानी आहे याचं उत्तर या प्रसंगात दडलंय.
माझ्या वर्गात शिकणारी लहान लहान लेकरं हेच माझ्या हसण्याचं कारण...
हैच माझ्या शिक्षकमाणूस म्हणून समृध्द अन समाधानी असण्याचं गमक...एक विद्यार्थी म्हणूनही !!!


फारूक एस.काझी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,अनकढाळ नं.1
ता.सांगोला , जि.सोलापूर

2 comments: