Search This Blog

Saturday, 10 January 2015

हसू आणि आसू....



आज सकाळची जेवणाची सुट्टी झाली.
सर्वजण मजाक मस्ती करत जेवलो.
जेवण होता होता पहिलीतला एक मुलगा आला व म्हणाला,"सर , सुजितदादा जेवला नाय.रडत बसलाय."
मी कट्ट्याकडं नजर टाकली.सुजित नेहमीच्या जागी जेवायला नव्हता.
मी सुजितला बोलावलं.
डोळे लालसर झालेले , मान खाली.
मला काहीच उमजेना.
"सुजित,काय झालं पिल्ल्या रडायला? कुणी काही बोललं का? काही अडचणय का?"
सुजितच्या डोळ्यांतून पाणी वाहतच होतं.

मग माझ्या लक्षात आलं 'चिमणीची पिल्लं'
"सुजित,पिल्लांसाठी रडतोय का रे??"
माझा आवाजही गदगदलेला....
त्याने मानेनेच होय बोलला.
मी समजून गेलो.त्याला दोन घास खायला लावले.

मला दोन दिवसांतल्या सगळ्या घटना आठवल्या.
शाळेसमोरची जुईची वेल तार तुडल्याने खाली पडलेली.मुलांना त्यात एक घरटं सापडलं .त्यात दोन पिली होती. चिमणीची.

काय करावं हा विचार डोक्यात येताच मुलांनी शाळेतल्या छापडीच्या घरात त्यांची राहण्याची व्यवस्था करून वर ठेऊन टाकलं.हेतू हा की मांजर जाऊ नये व आई आली तर पिलं लवकर सापडतील.
सुजितने त्यांना पाणी ठेवलं, खिरीसाठी भरडलेले गहू टाकले.
आजवर जी मुलं अशा लहान पिलांना दगडाने ठेचून मारत होती. इजा करत होती.तीच दोघं तिघं त्या पिलांसाठी धडपडत होती. सुजित त्यात अग्रेसर होता.

आज सकाळची शाळा. मुलांनी आल्या आल्या पिलांची हालहवा पाहिली.आणि पोरं जाग्यावर गपगार झाली !
एक पिलू मरून पडलेलं.सुजित जीव कळवळला.
तासाभरात दुसरा जीवही मरून गेला. सुजित पार कोलमडून गेला.दोन दिवसांत न जाणो काय नातं बनलं होतं त्यांचं !!

मुलांनी दोन्ही पिलांना पुरलं.व सोबत दोन गुलमोहराच्या बिया पेरून ठेवल्या.
मातीआड गेलेल्या पिलांची आठवण म्हणून दोन दगड ठेवले.
नावं दिली .....करण आणि आर्जुन ....


काळजात चर्र झालं.
सुजितची समजूत काढली .....पर आतून मीही गदगदलो होतो.

काल ख्रिसमसची भेट मिळालेले दोन इवले इवले जीव भरभरून आनंद देऊन या जगातनं चालतेही झाले......
काल त्या पिलांचे फोटो काढताना सुजित हरकला होता.हसत होता.पिलं अँगलने ठेवत होता.
पर
आज मात्र तो पिलांची समाधी पहायला आला नाही.वर्गात बेंचवर डोकं टेकवून रडत होता अन त्या लहान जीवाची समजूत काढायला माझं मोठंपणही उणं पडलं होतं.......!!!
दि. 27/12/2014

Tuesday, 6 January 2015




संवाद भाषा व माध्यम भाषा.

               प्राथमिक स्तरावरील मुलांचं लिखान अभ्यासताना मला सतत जाणवत आलं की मुलं जेव्हा लिहितात तेव्हा त्यात त्यांची घरातली भाषा डोकावत राहते.मंजे मुलांची जी घरची भाषा आहे ती त्यांच्या अभिव्यक्तीची , प्रकटीकरणाची मूलभूत आधार आहे. त्यात काही वावगं असण्याचंही कारण नाही.
               परंतु हे सर्व पाहत असताना मला सतत दोन शब्द खटकत आले.हो, खटकत आले. "बोली भाषा व प्रमाण भाषा"
               आजवर मराठीभाषा विश्वाने मायमराठीवर अनेकवार जुलूमच केलेत.ज्या लोकांचं जीवन गावकुसाबाहेर होतं त्यांच्या भाषेलाही "बोली" (हलक्या दर्जाची भाषा) म्हणून मराठी भाषा विश्वाच्या परिघाबाहेरच ठेवलं. व विशिष्ट भागात व विशिष्ट समाज गटात बोलल्या जाणा-या भाषेला "प्रमाण भाषा" ठरवलं गेलं. हा सरळ सरळ अन्याय होता. कारण प्रमाण भाषा हे सत्ताकारण व समाजकारणाशी जोडलं गेलेलं होतं.
               दलित साहित्याने जेव्हा चळवळीचं रूप घेतलं तेव्हा कुठे या परिघाबाहेरच्या भाषांची दखल घेतली जाऊ लागली. अन्यथा एकच भाषेचे समर्थक काय म्हणतात ते पाहिलं तर कळेल की बहुजनांच्या भाषा त्यांच्या दृष्टीने काय मोलाच्या आहेत ते.....
'खरोखर भाषा एकच पाहिजे.तिचे लेखनातील रूप हेच तिचे शुध्द रूप.बोलताना ती थोडीफार विकृत होते.या बोलीरुपातही सुशिक्षित शिष्ट उच्चवर्गिंयांकडून बोलले जाते , तेच तिचे ग्राह्य प्रमाण रूप. इतर रूपे अशुध्द,कारण अडाणी लोकांना कसे बोलावे, शुध्द उच्चार कसे सरावे, व्याकरणाची खरी रुपे कोणती,ते कळत नसते.' (मराठी विश्वकोष, खंड 11 , पान नं 927)
हे सर्व वाचताना चीड तर येतेच त्याहून एक गोष्ट सलत राहते की, आपण आपल्याच भाषेला बोली म्हणून हिणवत राहतो. व कुणीतरी म्हणतंय म्हणून कुणाच्या तरी भाषेला "प्रमाण" म्हणून मोकळे होतो.
             भाषा केवळ बोलली जात नाही. ती संवादाचं माध्यम असते. संवाद एकेरी असूच शकत नाही . ते केवळ बोलणं होतं. उदा. कानडी माणूस बोलतो तेव्हा आपण केवळ ऐकतो कारण काहीच कळत नाही. तिथं संवाद होत नाही.मात्र महाराष्ट्रात अशा अनेक भाषा आहेत ज्या संवादाच्या प्रभावी माध्यम आहेत. म्हणून त्यांना "बोली" न म्हणता "संवाद" भाषा म्हणावं.....आणि ज्याप्रमाणे आपण इंग्रजी भाषा नवीन ज्ञान मिळवण्यासाठी म्हणून "माध्यम" भाषा म्हणून वापरतो.अगदी तसंच केवळ पुणेरी भाषा ही माध्यम म्हणून स्वीकारलेली आहे.तिला "प्रमाण " न मानता , म्हणता " माध्यम" भाषा म्हणावं.....

            कुणी म्हणेल की नुसतं नाव बदलण्यानं काय होतं. ?? पण एवढंच सांगेन की नावात खूप काही दडलेलं असतं. आजवरच्या भाषिक राजकारणातून आमच्या संवाद भाषा थोडा मोकळा श्वास तरी घेतील. मुक्तपणानं बहरायला लागतील. आणि अशावेळी इंग्रजाळलेल्या संस्कृतीला आहारी गेलेल्यांना "मराठी मरतेय" असा गळा काढायची व वर्तमान पत्राचे रकानेच्या रकाने भरण्याची गरज भासणार नाही.
                                                                      (क्रमश:)

Saturday, 3 January 2015

या ‘ओझ्याचे’ करायचे काय ??



या ‘ओझ्याचे’ करायचे काय ??


घंटा होते
बांधाबांधावरून लेकरं
शाळेकडे धावताना
“स्कूल चले हम.....”
छान गाणं वाजायचं ...दूरदर्शनवर !
वाटायचं किती मजेत आहेत पोरं...!!

पण दुसऱ्याच क्षणी वाटून गेलं
या पोरांची दप्तरं ??
इतकी हलकी हलकी कशी???
कारण हल्ली तर प्रत्येक पाठीवर
नवीन जाडजूड पाठ दिसते.
झुकलेले खांदे
तुकलेली मान दिसते.

शिक्षणात ‘शिकणं’ विसरून गेलं
फक्त नि फक्त ‘बादली भरणं’ आलं
दप्तरांना नवनव्या बुकांचं
बोजड आजारपण जडलं.
शिकणं-शिकणं म्हणता म्हणता
‘शिकणं’च बिचारं हरवून गेलं.


दप्तरातल्या चिंचा,बोरं,कैऱ्या
भोवरे,गोट्या,भिरभिरं गेलं
नोटबुक ,वर्कबुक,प्रोजेक्ट बुक
कहाबाही साचतच गेलं.
दप्तर नावाचा दोस्त जाऊन
गुलामीचं नवीन साधन बनत गेलं.


सुटका हवीय ‘ओझ्यापासून ’
केवळ वह्या-पुस्तकांच्या नव्हे
तर,
‘माहिती’ नावाच्या ‘व्हायरस’पासून.
जो मेंदूत ‘माणूसपण’ टिकू देत नाही..
यंत्र बनऊन सोडतो.
बालपणाच्या कोवळ्या रोपांचं
‘बोन्साय’ करून टाकतो.

    ...फारूक एस.काझी.
   नाझरा.
   ता.सांगोला, जि.सोलापूर.४१३३०८
   ९९२१३८०९६६
   farukskazi82@gmail.com