या ‘ओझ्याचे’ करायचे काय ??
घंटा होते
बांधाबांधावरून लेकरं
शाळेकडे धावताना
“स्कूल चले हम.....”
छान गाणं वाजायचं ...दूरदर्शनवर !
वाटायचं किती मजेत आहेत पोरं...!!
पण दुसऱ्याच क्षणी वाटून गेलं
या पोरांची दप्तरं ??
इतकी हलकी हलकी कशी???
कारण हल्ली तर प्रत्येक पाठीवर
नवीन जाडजूड पाठ दिसते.
झुकलेले खांदे
तुकलेली मान दिसते.
शिक्षणात ‘शिकणं’ विसरून गेलं
फक्त नि फक्त ‘बादली भरणं’ आलं
दप्तरांना नवनव्या बुकांचं
बोजड आजारपण जडलं.
शिकणं-शिकणं म्हणता म्हणता
‘शिकणं’च बिचारं हरवून गेलं.
भोवरे,गोट्या,भिरभिरं गेलं
नोटबुक ,वर्कबुक,प्रोजेक्ट बुक
कहाबाही साचतच गेलं.
दप्तर नावाचा दोस्त जाऊन
गुलामीचं नवीन साधन बनत गेलं.
सुटका हवीय ‘ओझ्यापासून ’
केवळ वह्या-पुस्तकांच्या नव्हे
तर,
‘माहिती’ नावाच्या ‘व्हायरस’पासून.
जो मेंदूत ‘माणूसपण’ टिकू देत नाही..
यंत्र बनऊन सोडतो.
बालपणाच्या कोवळ्या रोपांचं
‘बोन्साय’ करून टाकतो.
...फारूक
एस.काझी.
नाझरा.
ता.सांगोला,
जि.सोलापूर.४१३३०८
९९२१३८०९६६
farukskazi82@gmail.com
No comments:
Post a Comment