संवाद भाषा व माध्यम भाषा.
प्राथमिक स्तरावरील मुलांचं लिखान अभ्यासताना मला सतत जाणवत आलं की मुलं जेव्हा लिहितात तेव्हा त्यात त्यांची घरातली भाषा डोकावत राहते.मंजे मुलांची जी घरची भाषा आहे ती त्यांच्या अभिव्यक्तीची , प्रकटीकरणाची मूलभूत आधार आहे. त्यात काही वावगं असण्याचंही कारण नाही.
परंतु हे सर्व पाहत असताना मला सतत दोन शब्द खटकत आले.हो, खटकत आले. "बोली भाषा व प्रमाण भाषा"
आजवर मराठीभाषा विश्वाने मायमराठीवर अनेकवार जुलूमच केलेत.ज्या लोकांचं जीवन गावकुसाबाहेर होतं त्यांच्या भाषेलाही "बोली" (हलक्या दर्जाची भाषा) म्हणून मराठी भाषा विश्वाच्या परिघाबाहेरच ठेवलं. व विशिष्ट भागात व विशिष्ट समाज गटात बोलल्या जाणा-या भाषेला "प्रमाण भाषा" ठरवलं गेलं. हा सरळ सरळ अन्याय होता. कारण प्रमाण भाषा हे सत्ताकारण व समाजकारणाशी जोडलं गेलेलं होतं.
दलित साहित्याने जेव्हा चळवळीचं रूप घेतलं तेव्हा कुठे या परिघाबाहेरच्या भाषांची दखल घेतली जाऊ लागली. अन्यथा एकच भाषेचे समर्थक काय म्हणतात ते पाहिलं तर कळेल की बहुजनांच्या भाषा त्यांच्या दृष्टीने काय मोलाच्या आहेत ते.....
'खरोखर भाषा एकच पाहिजे.तिचे लेखनातील रूप हेच तिचे शुध्द रूप.बोलताना ती थोडीफार विकृत होते.या बोलीरुपातही सुशिक्षित शिष्ट उच्चवर्गिंयांकडून बोलले जाते , तेच तिचे ग्राह्य प्रमाण रूप. इतर रूपे अशुध्द,कारण अडाणी लोकांना कसे बोलावे, शुध्द उच्चार कसे सरावे, व्याकरणाची खरी रुपे कोणती,ते कळत नसते.' (मराठी विश्वकोष, खंड 11 , पान नं 927)
हे सर्व वाचताना चीड तर येतेच त्याहून एक गोष्ट सलत राहते की, आपण आपल्याच भाषेला बोली म्हणून हिणवत राहतो. व कुणीतरी म्हणतंय म्हणून कुणाच्या तरी भाषेला "प्रमाण" म्हणून मोकळे होतो.
भाषा केवळ बोलली जात नाही. ती संवादाचं माध्यम असते. संवाद एकेरी असूच शकत नाही . ते केवळ बोलणं होतं. उदा. कानडी माणूस बोलतो तेव्हा आपण केवळ ऐकतो कारण काहीच कळत नाही. तिथं संवाद होत नाही.मात्र महाराष्ट्रात अशा अनेक भाषा आहेत ज्या संवादाच्या प्रभावी माध्यम आहेत. म्हणून त्यांना "बोली" न म्हणता "संवाद" भाषा म्हणावं.....आणि ज्याप्रमाणे आपण इंग्रजी भाषा नवीन ज्ञान मिळवण्यासाठी म्हणून "माध्यम" भाषा म्हणून वापरतो.अगदी तसंच केवळ पुणेरी भाषा ही माध्यम म्हणून स्वीकारलेली आहे.तिला "प्रमाण " न मानता , म्हणता " माध्यम" भाषा म्हणावं.....
कुणी म्हणेल की नुसतं नाव बदलण्यानं काय होतं. ?? पण एवढंच सांगेन की नावात खूप काही दडलेलं असतं. आजवरच्या भाषिक राजकारणातून आमच्या संवाद भाषा थोडा मोकळा श्वास तरी घेतील. मुक्तपणानं बहरायला लागतील. आणि अशावेळी इंग्रजाळलेल्या संस्कृतीला आहारी गेलेल्यांना "मराठी मरतेय" असा गळा काढायची व वर्तमान पत्राचे रकानेच्या रकाने भरण्याची गरज भासणार नाही.
(क्रमश:)
No comments:
Post a Comment